Sunday 14 March 2010

कविवर्य विंदा यांचे काल देहावसान झाले. माझ्या आवडत्या कविपैकी एक..
बा सी मर्ढेकर आणि कुसुमाग्रजांच्या पंगतीतला आणखी तारा आमचे आकाश सोडून गेला..


माझ्या मना बन दगड
हा रस्ता अटळ आहे!
अन्नाशिवाय, कपडय़ाशिवाय,
ज्ञानाशिवाय; मानाशिवाय.
कुडकुडणारे हे जीव
पाहू नको! डोळे शीव!
नको पाहू जिणे भकास;
ऐन रात्री होतील भास;
छातीमध्ये अडेल श्वास.
विसर यांना, दाब कढ;
माझ्या मना बन दगड!

हा रस्ता अटळ आहे!
ऐकू नको हा आक्रोश,
तुझ्या गळय़ाला पडेल शोष.
कानांवरती हात धर,
त्यातूनही येतील स्वर.
म्हणून म्हणतो ओत शिसे;
संभाळ, संभाळ, लागेल पिसे!
रडणाऱ्या, रडशील किती?
झुरणाऱ्या, झुरशील किती?
पिचणाऱ्या, पिचशील किती?
ऐकू नको असला टाहो;
माझ्या मना दगड हो!

हा रस्ता अटळ आहे!
येथेच असतात निशाचर
जागोजाग रस्त्यावर.
असतात नाचत काळोखात;
हसतात विचकून काळे दात;
आणि म्हणतात, ‘‘कर िहमत,
आत्मा वीक, उचल किंमत!
माणूस मिथ्या, सोने सत्य;
स्मरा त्याला, स्मरा नित्य.’’
भिशील ऐकून असले वेद;
बन दगड, नको खेद!

बन दगड आजपासून;
काय अडेल तुझ्यावाचून;
गालावरचे खारे पाणी
पिऊन काय जगेल कोणी?
काय तुझे हे नि:श्वास
मरणाऱ्यांना देतील श्वास?
आणिक दु:ख छातीफोडे
देईल त्यांना सुख थोडे?
आहे दु:ख तेच फार;
माझ्या मना कर विचार!
कर विचार : हस रगड;
माझ्या मना बन दगड!

हा रस्ता अटळ आहे!
अटळ आहे घाण सारी;
अटळ आहे ही शिसारी.
एक वेळ अशी येईल
घाणीचेच खत होईल!

अन्यायाची सारी शिते
उठतील पुन्हा; होतील भुते.
या सोन्याचे बनतील सूळ!
सुळी जाईल सारे कूळ.
ऐक टापा! ऐक आवाज!
लाल धूळ उडते आज;
याच्यामागून येईल स्वार;
या दगडावर लावील धार!
इतके यश तुला रगड;
माझ्या मना बन दगड!

    --विंदा 

2 comments:

Anagha said...

किती सुंदर! मनाला भिडते...आणि विचार करायला लावते.. :)

A Spectator said...

I was searching for this poem. Got it on your blog.
John Steinbeck said once that he likes to leave his reader unstable, restless after reading his words. Same happens with this poem. Words which touch us do not keep us happy, they either push us in silence or keep us engrossed in thoughts.