Tuesday 1 February 2011

अश्वत्थामा



एकेकाळी न्युटन प्रमाण, अगदी वेदवचन(!) म्हणून मनात घट्ट समज होता..
जगाकडे त्याच दृष्टीने अगदी त्याच्याच दृष्टीने पाहू लागलो, सगळ्या गोष्टी साध्या सरळ.. म्हणजे सरळ रेषा सरळ आणि क्रियेला प्रतिक्रिया... गुरुत्वाकर्षण नाही पचले अजून तरीपण न्यूटन ठायी ठायी सिद्ध होत होता आणि मग..
मग अचानक आईनस्टाईन भेटावा आणि त्याने सगळे समज, सगळी गृहितकं अशी हलवावीत की बस्स...
सकाळी उठून सगळंजग नवीन नवीन भासू लागतं..
नव्हे सगळं अगदी नव्याने दिसू लागतं..
सरळ रेषा सरळ राहत नाही.. आणि स्थिर वस्तू स्थिर राहत नाही..
सगळ्याच गोष्टी सापेक्ष होऊन बसतात.. सापेक्षता गोंधळ उडवून देते आणि पार matrix चा Neo होऊन जातो..

पण मग या नव्याबद्दलदेखील मन शंका घेऊ लागतं.. प्रकाशवेग प्रमाण पण मग काय?..  पण साला आपण (अजून तरी) आईनस्टाईन नाही आहोत.. खोक्याबाहेरचा विचार नाही होत.. प्रयत्न कर क्ररून पण चौथी मिती (dimension) पचता पचत नाही... आणि मग पाचवी सहावी कुठे घेऊन बसता..

गेली बरीच वर्षे रस्ता तसा धुक्यातच आहे..
आणि मी धावतोय या धुक्यात.. अगदी या धुक्याने वेडा होऊन...
या काळात असंच काहीसं झालं.. मनात रुजलेले बरेच समज, गृहितकं, तत्वं (शब्दपण भलते जड हो ! ) अगदी गदगदा हलवली गेली.. काही पार नष्ट पण झाली..
त्या डिस्नेच्या 'बोल्ट' चित्रपटातल्या बोल्ट सारखी reality अधून मधून वेडावत समोर आलीय.. आणि कधी क्रूरपणे तर कधी अतिशय अलिप्ततेने ही वास्तविकता 'बरोबर' किंवा 'सत्य' या संकल्पनांचा विचार करायला लावून गेलीय..

दर वेळेस नापास विद्यार्थ्यासारखा मी तीच प्रश्नपत्रिका हातात घेतो आणि दर वेळी नवीन अथवा सुधारीत उत्तर सुचतं...
विक्रम वेताळासारखा हा खेळ किती जन्म चाललाय काय माहित..
मग वेदांच्या निर्मात्यांना दंडवत होतो.. त्या कधी न वाचलेल्या अमूल्य ग्रंथांच्या असंख्य अनामिक कर्त्यांना दंडवत..
वाटतं.. या ग्रंथांचा आवाका समजणे, अर्थ लागणे फार सोपे असणार .. पण त्यासाठी आईनस्टाईन लागेल.. काखेतला कळसा दाखवायला..
तोवर आम्ही फिरू असेच अश्वत्थाम्यासारखे..
अस्वस्थ.. अस्वस्थ..

- सचिन