Sunday 12 February 2012

अभिरुची म्हणजे नक्की काय?



गेल्या आठवड्यात 'उत्सुकतेने मी झोपलो' वाचले.. आणि या प्रश्नाचा किडा डोक्यात वळवळू लागला.. तसा आधी पण हा प्रश्न पडायचा.. या वेळेस तो जास्त तीव्रतेने जाणवला म्हणून मांडतोय..
या पुस्तकाबद्दल बऱ्याच लोकांकडून ऐकले होते.. पण शेवटची कथा सोडली तर बाकी पुस्तक दर्जाच्या बाबतीत ठीक ठीक देखील वाटले नाही.. मग प्रश्न पडला की इतक्या लोकांनी का त्याला नावाजले असेल ? की चार समीक्षकांनी चांगले म्हटले म्हणून बाकीचे म्हणत आहेत ?

बऱ्याच चित्रांच्या बाबतीत पण हीच गोष्ट, म. फी. हुसेन (अथवा तसाच कोणीही नावाजलेला चित्रकार) यांचे चित्र आहे हे सांगण्याची का गरज पडावी.. आणि मग त्याला कोट्यावधी रुपयांचे मूल्य कशाबद्दल ? मग मूल्य चित्राचे की चित्रकाराच्या नावाचे.. मग ती विकणारे, विकत घेणारे अथवा त्यावर भरभरून लिहिणारे 'कलेचे जाणकार' कसे म्हणावेत? 
आमचा एक मित्र म्हणे की 'म. फी. हुसेन' यांनी कागदावर पानाची पिंक टाकली तरी तिला 'मॉडर्न आर्ट' म्हणून लोक करोडो रुपये देउन विकत घेतील आणि समीक्षक त्यात काय काय दिसते आहे ते जड जड शब्दात लिहीत बसतील.. मग याही बाबतीत जगाची दांभिकता जास्त वाटत नाही का ?

मी पिकासोची, Vincent van Gogh किंवा Renoir या सारख्या प्रसिद्ध चित्रकारांची प्रदर्शनातली चित्रे पहिली आहेत आणि तेव्हा देखील जरी हे अद्वितीय चित्रकार असले तरी काही चित्रे फक्त त्यांच्या नावावर तिथे येउन बसली आहेत असे वाटत राहते.. 
'काफ्का' सारखा ताकदीचा लेखक देखील ढीगभर भरकटलेला दिसतो बऱ्याच ठिकाणी.. तरीही त्याला 'अगम्य' असं तर्क विवेचन देत लोक justify करू लागतात तेव्हा ती आंधळी भक्तीच नाही का ठरत.. तेच मराठी लेखकांच्या (व कलाकारांच्या ) बाबतीत ही म्हणता येईल..

मग प्रश्न उठतो की एकदा चांगला कलाकार म्हटले की त्याच्या कलेला खराब म्हणणे हा फक्त निवडक समीक्षकांचा अधिकार उरतो का? मग उच्च अभिरुची आणि इतर असेही भेद हे लोक ठरवणार काय ? नाही आवडलं तर दुर्लक्ष कर असे सल्ले देऊ शकाल पण मग 'आवडले नाही' असे म्हणणे का चूक ठरावे ? लेखक व कलाकार फार मोठा आहे म्हणून ?

इथे एक कथा समोर ठेवावीशी वाटते.. 
एकदा एका पुजाऱ्याने जाहीर केले की उद्या सकाळी देव स्वतः प्रकट होणार आहे मंदिरात.. पण अट एकच, फक्त पुण्यवान लोकांना तो दिसेल.. पापी लोकांना नाही.. 
मग काय दुसऱ्या दिवशी मंदिरात आलेल्या सगळ्याच लोकांना देव दिसला.. त्याचे पितांबर आणि मुकुट याच्या चर्चा सुरु झाल्या.. 
थोडक्यात काय तिथे सर्वच जण पुण्यवान ठरण्याची धडपड करत असल्यावर नसलेला देव पण दिसणार.. आणि ज्यांना नाही दिसला ते पापी ठरणार.. 

मग तसेच इथे जर एखादी कलाकृती चांगली नाही म्हटले तर 'अरसिक' ठरू कलेच्या प्रांतातले अडाणी ठरू या भीतीपायी तर बऱ्याच कलाकृतींना hype केले जात नसेल काय ?
या क्षेत्रातही मग देव, काही बडवे आणि मग स्वतंत्र विचाराना बंधने (अप्रत्यक्षपणे अर्थात! ) अशी व्यवस्थाच होतेय नाही का?

1 comment:

Swati said...

Very well put!
सगळी माणसे सारखी नसतात, त्याचप्रमाणे त्यांची अभिरुचीसुध्दा भिन्नच असते.
प्रस्थापितांच्या विरोधात काही बोलणे हे सर्वच क्षेत्रात अवघड आहे... लोकशाहीत सुध्दा!
जसा आइनस्टाइनचा रिलेटिव्हिटीचा सिध्दांत सर्वत्र लागू होतो (किंवा अती विचार करणारे लोक तो तसा लागू करू शकतात...), तसाच डार्विनचा सिध्दांतही इथे लागू होतो...
Survival of the fittest!!!
पण अर्थातच यामुळे अल्पसंख्यांकांचे अस्तीत्व नाकारले जात नाही... प्रश्न उरतो तो केवळ त्यांच्या अभिव्यक्तीच्या इच्छेचा आणि प्रवाहाविरुध्द पोहोण्याच्या बळाचा..!