Wednesday, 20 October 2010
पाऊस..
आज सकाळ तर पावसात भिजलेली होती..
आळसावालेला मी जेव्हा उठून खिडकीजवळ आलो तेव्हा मात्र खूप खुश झालो. कारण आजचा पाऊस तसा वेगळा होता.
इथला नेहमीचा पाऊस म्हणजे ढिगभर ढग येऊन दिवसभर वातावरणनिर्मिती करतात आणि मग कधीतरी झिरझिर पाऊस सुरु होतो.. आठवडयातले एक दोन दिवस तरी हे गाणं चालतंच पण त्यात मजा नाही.
आज मात्र पाऊस दणकट आहे अगदी मान्सूनसारखा.. आणि मग मान्सूनच्या पहिल्या पावसाची आठवण मला पार खुश करून गेली..
मला आठवतंय.. आमच्या घरी मी माडीवरच्या बागेच्या बाजूच्या गच्चीमध्ये चहाचा कप घेऊन बसायचो.. पाऊस बघत.. सगळी बागेतली झाडं चिडिचुप्प आणि पावसाचं गाणं.. आता नारळ मोठा झालाय म्हणे .. कदाचित तो साथ देत असेल पावसाला गायला.. पुढच्या पावसात भेटेन त्याला बहुतेक...
आता इथे मागे बागेत एक लिंबाचं झाड आहे.. माझ्या मते बागेतल्या सगळ्या झाडांमध्ये त्याला पाऊस सगळ्यात जास्त आवडतोय..
त्याची प्रत्येक फांदी, डहाळ्या अन् पान पान पाऊस मनसोक्त अनुभवतेय.. पावसाचा थेंब थेंब झेलू पाहणारं इवलसं पान.. थेंब पडला की मात्र त्याला त्याचा भार सोसवत नाही आणि झुकलेल्या पानावरून तो थेंबपण वाकुल्या दाखवत निघून जातो आणि मग पान आणि पानाची फांदी हलुडोलु लागतात आणि जेव्हा असंख्य थेंबानी झाडाचं पान न् पान नाचू लागतं तेव्हा असं वाटतं की अख्खं झाडच शहारुन आलंय..
यात जर उन्हं आली की मग काय सांगावं..!!
मागे इन्द्रधनुष्य घेऊन चमचमणाऱ्या झाडांचे वृक्षनृत्य आणि हातात चहाचा कप वाहवा !!
(झालं! कवी चावला सकाळी सकाळी.. :) )
शेजाऱ्याच्या बागेत एक छोटे गोल तळे बनवलं आहे त्याने... त्याच्यात एका बाजूला अर्धी पाण्यात उभी अशी पिवळ्या जांभळ्या फुलांची झुडुपे आहेत तर दुसऱ्या काठावर पांढरी घोसदार फुले असलेलं एक झाड, थोडं त्या तळ्यावर झुकलेलं..
त्याच्या फुलांच्या पाकळ्या पाण्यावर तरंगताहेत आणि आता पावसात कोसळणाऱ्या सरी चुकवण्यासाठी जणू त्यांची लगबग होतेय .. पाण्यावर तरंग त्यांचे आणि पावसाचं संगीत..
माझ्याबरोबर खिडकीच्या कोपर्यात बसलेला भुंगा आणि पावसाने वैतागलेले (कदाचित!) काही पक्षी आजूबाजूला .. एवढे सोडले तर बाकी सगळा अव्यक्त परिसर या पावसाने जणू जिवंत केलाय .. हा पाऊस इथे फक्त त्यांच्यासाठीच आलाय..
आता ऊन येऊ लागलंय आणि पाऊस ही थांबलाय.. भुंगा पंख झाडत उडून गेलाय, पावसाच्या गाण्याची जागा पक्ष्यांच्या सुरांनी घेतलीये ..
आणि माझा पण चहा संपलाय .. :)
-सच
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
हे वाचून पाडगावकरांची एक कविता आठवली -
"रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी
निळ्या रेशमी पाण्यावरती थेंब बावरी नक्षी
गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा
श्रावणात घन नीला बरसला रिमझिम रेशीम धारा !!! "
पाऊस पडल्यावर लिंबाच्या झाडाचे वर्णन दाखवून देते कि तू पण "जे न देखे रवी ते देखे कवी " या वाटेवरचा आहेस तर :)
मी मिनाक्षिच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे..
लेख वाचत असताना, पावसातल्या सगळ्या आठवणी अगदी पावसाळ्यातल्या ढगांप्रमाणे दाटून आल्या होत्या..
तुझा लेख अतिशय वाचनीय आहे, शेवटपर्यंत गूंगवून ठेवतो.. मला तर भूंग्याच्या पंखांची झडझड सुद्धा ऐकू आली..
ये दिल मांगे अजून मोअर ..
Post a Comment