हळू हळू विसरून जाणार सगळे आता...
आणि मग एक अनोखा अवघडलेला दुरावा साचणार..
आणि मग पुन्हा जेव्हा भेट होईल तेव्हा बरेच काही बदललेले भासेल..
तुलापण आणि मलापण..!
मग काही शिष्टाचार मध्ये येतील मदत करायला.. विचारपूस होते.. आणि मग सगळे आपापल्या मार्गाला..
काहीतरी निसटून जाते आहे ही जाणीव सर्वांनाच.. पण त्याचा विचार करायला वेळ नसणार ..
बर्याच गोष्टी अशाच निसटून जातात.. काही कळत.. काही नकळत..
कधीतरी काहीतरी टोचते आत खोलवर..
पण कळतच नाही काय आहे ते..
कारण आठवणी पण अशाच पुसून गेलेल्या असतात.. फ़िकट झालेल्या असतात..
तरीही काही आठवणींचे वास मागे उरलेले .. सगळे एकमेकांत मिसळलेले..
आणि एखाद्या संध्याकाळी.. कातरवेळी मग मन का भरून आले ते आपल्याला पण कळत नाही...
-- सच
एवढंच ना?
श्वासाला श्वास, क्षणाला क्षण, दिवसाला दिवस जोडत जगू!
एवढंच ना?
घराचे भास , अंगणाचे भास, कुंपणाचे भासच भोगत जगू,
एवढंच ना?
स्वतःचं पाय, स्वतःचं वाट, स्वतःचं सोबत होऊन जगू
एवढंच ना?
मातीचं घर, मातीचं दार, मातीच्या देहाला मातीचे वार
मातीचं खरी, मातीचं बरी, मातीत माती मिसळत जगू
एवढंच ना?